मोर्शी तालुक्यात प्रा. डॉ. प्रशांत विघे यांच्या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद;
मोर्शी प्रतिनिधी : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर विविध शिक्षक संघटनांचे अधिकृत उमेदवार प्रा. डॉ. प्रशांत विघे यांनी मोर्शी तालुक्यात व्यापक प्रचार दौरा करून शिक्षकांशी थेट संवाद साधला. शिवाजी हायर सेकंडरी स्कूल, जिजामाता स्कूल, भारतीय महाविद्यालय, स्व. अण्णासाहेब कानफाडे शिवाजी हायस्कूल, नगरपरिषद उर्दू हायस्कूल आदी शैक्षणिक संस्थांना भेट देत त्यांनी शिक्षकांच्या समस्या, शैक्षणिक धोरणे आणि शिक्षक मतदारसंघाच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा केली.
शिवाजी हायस्कूल, मोर्शी येथे आयोजित प्रमुख सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मिलिंद ढाकूरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. संतोष आगरक, व्यासपीठावर प्रा. डॉ. संदीप राऊत, मुख्याध्यापक दानिश सर तसेच शिक्षक मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार प्रा. डॉ. प्रशांत विघे उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्रा. डॉ. संदीप राऊत यांनी डॉ. प्रशांत विघे यांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक आणि संघटनात्मक कार्याचा परिचय करून देताना सांगितले की, "प्रा. डॉ. प्रशांत विघे हे शिक्षण क्षेत्राचा सर्वांगीण अभ्यास असलेले, संशोधनाभिमुख आणि शिक्षकांच्या प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडणारे नेतृत्व आहे. शिवाजी हायस्कूलचा विद्यार्थी आज विद्यापीठ सिनेट सदस्य, राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचा सदस्य म्हणून कार्यरत असून आता शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवत आहे, ही मोर्शीकरांसाठी अभिमानाची बाब आहे. अशा अभ्यासू आणि तरुण नेतृत्वाला विधान परिषदेत पाठविणे ही काळाची गरज आहे."
यावेळी प्रा. डॉ. प्रशांत विघे यांनी 'शिक्षक मतदारसंघाचे महत्त्व आणि माझी उमेदवारी का?' या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की, शिक्षक मतदारसंघ हा केवळ निवडणुकीचा मंच नसून शिक्षण क्षेत्रातील धोरणात्मक प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम आहे. शिक्षक आमदार हा केवळ एखाद्या संघटनेचा प्रतिनिधी नसून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा अभ्यासू धोरणकर्ता असला पाहिजे.
आपल्या भाषणात त्यांनी राज्यातील शिक्षण क्षेत्रासमोरील गंभीर आव्हानांचा ऊहापोह केला. १५ मार्च २०२४ रोजीच्या संचमान्यता निर्णयामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची परिस्थिती निर्माण झाली असून त्याचे दूरगामी परिणाम शिक्षण व्यवस्थेवर होत असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील हजारो शाळांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगत त्यांनी शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामीण शिक्षण व्यवस्थेच्या भवितव्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) संदर्भात बोलताना त्यांनी धोरणातील सकारात्मक बाबींसह प्रत्यक्ष अंमलबजावणीतील त्रुटी, शिक्षकांवरील वाढते प्रशासकीय ओझे, रिक्त पदांचा प्रश्न, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आव्हाने आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील बदलत्या वास्तवाचे विश्लेषण केले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी शिक्षकांना सक्षम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
सभेचे अध्यक्ष मुख्याध्यापक मिलिंद ढाकूरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, "प्रा. डॉ. प्रशांत विघे यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ समस्या मांडत नाहीत, तर त्या समस्यांची कारणमीमांसा, त्यावरील उपाययोजना आणि शासनस्तरावर करावयाच्या धोरणात्मक बदलांचीही अभ्यासपूर्ण मांडणी करतात. अशा प्रकारचे नेतृत्व विधान परिषदेत गेल्यास दिवंगत प्रा. बी. टी. देशमुख यांनी ज्या पद्धतीने शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले, त्याच परंपरेत अनेक प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास वाटतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ठाकरे सर यांनी केले. कार्यक्रमाला मोर्शी परिसरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संवादात्मक वातावरणात झालेल्या या बैठकीत शिक्षकांनी विविध शैक्षणिक, प्रशासकीय आणि सेवाविषयक प्रश्न उपस्थित केले. त्यावर प्रा. डॉ. प्रशांत विघे यांनी अभ्यासपूर्ण उत्तरे देत शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करण्याची ग्वाही दिली.
मोर्शी तालुक्यातील हा प्रचार दौरा शिक्षकांशी थेट संवाद, शैक्षणिक धोरणांवरील सखोल चर्चा आणि शिक्षक मतदारसंघाच्या विधायक भूमिकेचे प्रभावी सादरीकरण यामुळे विशेष लक्षवेधी ठरला.



Post a Comment
0 Comments