वरुड प्रतिनिधी: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर प्रा. डॉ. प्रशांत विघे यांच्या संवाद भेटी व प्रचार दौऱ्याला शाळा, महाविद्यालयांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिक्षकांच्या शैक्षणिक, सेवाविषयक व सामाजिक प्रश्नांची प्रभावीपणे मांडणी करण्यासाठी शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून शिक्षकच सभागृहात जाणे ही काळाची गरज आहे, असे मत यावेळी शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच संस्थाचालकांनी व्यक्त केले.
यावेळी ना. तु. रडके विद्यालयाचे मुख्याध्यापक बरडीया सर यांनी शिक्षकांचे नेतृत्व करण्यासाठी शिक्षक प्रतिनिधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. शैक्षणिक क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्यासाठी आपल्यापैकीच एक सहकारी सभागृहात जाणे आवश्यक असून, शिक्षकांच्या प्रश्नांची जाणीव आणि त्यासाठी संघर्ष करण्याची क्षमता असलेले नेतृत्व आज नितांत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. पी. आर. राजपूत यांनी शैक्षणिक क्षेत्रासमोरील वाढती आव्हाने आणि अधोगती थांबविण्यासाठी एका अभ्यासू आणि प्रभावी नेतृत्वाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. प्रा. डॉ. प्रशांत विघे यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वाच्या पाठीशी शिक्षकांनी उभे राहिल्यास शैक्षणिक क्षेत्राचा प्रवास अधिक सुरक्षित, सुखकर व तेजोमय करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रा. डॉ. प्रशांत विघे यांनी शैक्षणिक क्षेत्रातील आपल्या प्रदीर्घ प्रवासातील अनुभव मांडताना शिक्षकांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत सक्षम आणि अभ्यासू नेतृत्वाची गरज अधोरेखित केली. चुकीच्या व्यक्तीच्या हाती नेतृत्व गेल्यास त्याचा नकारात्मक परिणाम धोरणात्मक निर्णयांवर आणि त्यातून शिक्षकांच्या भवितव्यावर होऊ शकतो संदर्भात, १५ मार्च २०२४ रोजी निर्गमित शासन निर्णयामुळे निर्माण झालेल्या शिक्षक व शाळांच्या प्रश्नांचा, तसेच जुनी पेन्शन योजना, सेवा-सुरक्षा आणि अनुदान इत्यादी विविध शासन निर्णयांचा दाखला देत, या प्रश्नांवर प्रभावीपणे विचार प्रस्तुत केले. मागील काही वर्षांतील शासन निर्णयांचा अभ्यास केला असता शिक्षकांच्या हिताशी संबंधित अनेक प्रश्नांमध्ये अधिक स्पष्टता आणि ठोस पाठपुराव्याची आवश्यकता जाणवते. त्यामुळे शिक्षकांच्या सुरक्षित भविष्यासाठी शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेला आणि शासनाकडून अनुकूल निर्णय करून घेण्याची क्षमता असलेला प्रतिनिधी निवडणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
या संवाद दौऱ्यात प्रा. डॉ. प्रशांत विघे यांनी स्व. माणिकलालजी गांधी जागृत विद्यालय व शंकरराव वंदे कनिष्ठ महाविद्यालय, पावडे महाविद्यालय जरुड, महात्मा फुले विद्यालय, धनोडी, उत्क्रांती शिक्षण संस्था संचालित वसंतराव नाईक विद्यालय, जरूड, ऑरेंज सिटी इंग्लिश स्कूल, वरुड येथील भेटी देऊन शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधला आणि त्यांच्या विविध समस्या जाणून घेत त्यावर सविस्तर चर्चा केली.
या संवाद दौऱ्यात ज्येष्ठ शेतकरी नेते दिलीप भोयर, शैक्षणिक क्षेत्रातील विचारवंत रामराव वानखेडे, प्रा . दर. प्रशांत चर्जन, आदिवासी समाजाचे प्रखर नेतृत्व गणेश कुसराम, प्रमोद राऊत, मुख्याध्यापक बंडू गावंडे, देवराळे सर, प्रवीण मोहोड, मयूर देवहाते, लवसिंग राठोड, विजय राठोड, वैभव भगत यांच्यासह विविध शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षक सहभागी झाले होते.

Post a Comment
0 Comments