Type Here to Get Search Results !

हलक्या पावसातही चांदूर बाजारचा वीजपुरवठा ठप्प

 चांदूर बाजार : चांदूरबाजार शहरासहपरिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हलक्या ते मध्यम पावसासोबत वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हलका पाऊस किंवा वाऱ्याची साधी झुळूक आली तरी, वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार फ्यूज उडणे, वीजवाहिन्यांमध्ये बिघाड होणे

तसेच तारांच्या घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.शहरात दिवसभर आणि रात्रीही दहा-पंधरा मिनिटांच्या अंतराने वीज ये-जा करत असल्याने घरगुती कामांसह व्यावसायिक व्यवहारांवरही परिणाम होत आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या वातावरणात दमटपणा वाढल्यानेवृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींची गैरसोय अधिक होत असून पंखे, कुलर व वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने परिस्थिती आणखी बिकट होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तक्रार नोंदविण्यासाठी ग्राहकांना महावितरणच्या कॉल सेंटरशी संपर्कसाधावा लागतो. मात्र, पावसाळ्यात तक्रारींचा वाढलेला भार असल्याने संबंधित क्रमांक अनेकदा सतत व्यस्त लागत असल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे. त्यामुळे तक्रारींचे त्वरित निराकरण होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. दरम्यान, शहरातील अनेक ठिकाणी रोहित्रांचे फ्यूज बॉक्स उघडे असल्याचे दिसून येत असून काही ठिकाणी सुरक्षेच्या निकषांकडे दुर्लक्ष करून फ्यूजमध्ये जाड अॅल्युमिनियम तारांचा वापर करण्यात आल्याची चर्चा आहे. तसेच जुन्या व जीर्ण झालेल्या वीजतारा वाऱ्यामुळेतुटण्याचे प्रकारही वाढत असल्याने भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांची कामे होत असल्याचा दावा केला जात असला, तरी अखंडित व सुरक्षित वीजपुरवठा ही मूलभूत सुविधा अद्यापही नागरिकांना मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्या, रोहित्रे आणि इतर यंत्रणेची प्रभावी देखभाल व दुरुस्ती करून अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी नागरिकांनी महावितरणकडे केली आहे


Post a Comment

0 Comments