अनागोंदीविरोधात सक्षम शिक्षक नेतृत्वाची गरज; यवतमाळ येथे डॉ. प्रशांत विघे यांच्या प्रचार कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन
यवतमाळ प्रतिनिधी : शिक्षण व्यवस्थेत वाढत चाललेली अनागोंदी, प्रशासकीय हस्तक्षेप आणि शिक्षकांसमोरील गंभीर प्रश्नांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी शिक्षकांनी संघटित होऊन परिवर्तनाची चळवळ उभी करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी उपसभापती तथा माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंतराव पुरके यांनी केले. शिक्षकांच्या एकजुटीशिवाय सक्षम शिक्षण व्यवस्था आणि सुदृढ समाजव्यवस्था उभी राहू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विविध शिक्षक संघटनांच्या संयुक्त उमेदवार प्रा. डॉ. प्रशांत विघे यांच्या यवतमाळ जिल्हा निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तपोवन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष गवई होते. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे डॉ. पृथ्वीसिंह राजपूत, श्री. बाळासाहेब धांदे, प्राचार्य डॉ. धर्मेंद्र तेलगोटे, प्राचार्य डॉ. संतोष आगरकर, प्राचार्य डॉ. सुनील चकवे, प्राचार्य डॉ. दिलीप खुपसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकात डॉ. पृथ्वीसिंह राजपूत यांनी प्रा. डॉ. प्रशांत विघे यांच्यासारख्या अभ्यासू, कार्यक्षम आणि संघर्षशील नेतृत्वाची आज शिक्षण क्षेत्राला नितांत आवश्यकता असल्याचे सांगितले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे नेतृत्व म्हणून त्यांनी डॉ. विघे यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच विदर्भाच्या विकास अनुशेषाचा मुद्दा उपस्थित करत स्वर्गीय बी. टी. भाऊ देशमुख यांनी विधान परिषदेत केलेल्या प्रभावी कार्याचा उल्लेख केला. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विदर्भातील सिंचन अनुशेषासह शिक्षण क्षेत्रात अनेक सकारात्मक बदल घडून आल्याचे सांगत, विदर्भाचा बुलंद आवाज ठरणारा सक्षम शिक्षक प्रतिनिधी विधान परिषदेत निवडून देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. सुभाष गवई यांनी प्रा. डॉ. प्रशांत विघे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत सांगितले की, कोणतेही शासकीय किंवा राजकीय पद नसतानाही त्यांनी हजारो शिक्षक, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांची कामे प्रामाणिकपणे व परिणामकारकपणे मार्गी लावली आहेत. "काम सांगा, रिझल्ट घ्या" ही घोषणा त्यांच्या कार्यपद्धतीचे अचूक प्रतिबिंब असल्याचे त्यांनी नमूद केले. सामान्य कार्यकर्ता म्हणून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विश्वास, आपुलकी आणि कार्यक्षमतेची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. पदापेक्षा जनसेवेला अधिक महत्त्व देत प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे नेतृत्व आजच्या काळात आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना डॉ. गवई म्हणाले की, शिक्षक मतदारसंघातून अशा अभ्यासू, कर्तृत्ववान, लोकाभिमुख आणि शिक्षकांच्या प्रश्नांशी प्रत्यक्ष जोडलेल्या नेतृत्वाला विधान परिषदेत पाठविणे ही काळाची गरज आहे. जनतेचा आणि शिक्षकांचा आवाज प्रभावीपणे विधान परिषदेत मांडण्याची क्षमता प्रा. डॉ. प्रशांत विघे यांच्यामध्ये असून विकासाभिमुख विचारांना दिशा देणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याविषयी शिक्षक आणि नागरिकांमध्ये दृढ विश्वास निर्माण झाला आहे.
ज्यावेळी त्यांनी पाचवा, सहावा आणि सातवा वेतन आयोगाच्या आंदोलनांचा संदर्भ देत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सत्ताधारी वर्गाने वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेचे विश्लेषण केले. शिक्षकांनी संघटित शक्ती निर्माण करून आपल्या न्याय्य हक्कांसाठी प्रभावी लढा उभारला तरच शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांना न्याय मिळू शकेल, असे आवाहन गवई यांनी केले.
यावेळी प्रा. डॉ. प्रशांत विघे यांनी आपल्या उमेदवारीमागील भूमिका स्पष्ट करत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर विधान परिषदेत प्रभावीपणे आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त केला. शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी सातत्याने संघर्ष करण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.
पुढे प्रा. वसंतराव पुरके म्हणाले की, कार्यकुशल, निष्कलंक आणि शिक्षकांच्या प्रश्नांप्रती सातत्याने लढणारे नेतृत्व म्हणजे डॉ. प्रशांत विघे याचं आहे. शिक्षक, शिक्षण आणि समाजहितासाठी त्यांनी प्रामाणिकपणे केलेले कार्य प्रेरणादायी आहे. अशा सक्षम, अभ्यासू आणि संघर्षशील व्यक्तिमत्त्वाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी डॉ. प्रशांत विघे यांना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेश्री धर्माधिकारी यांनी केले, तर प्राचार्य डॉ. आर. एन. देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षणप्रेमी नागरिक आणि मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते.

.jpeg)

.jpeg)
.jpeg)
Post a Comment
0 Comments